जळगाव मनपा निवडणुक : दाणा आला, तरच बगळे उडणार!’

पैशांच्या वाटपासाठी कार्यकर्त्यांची कोडभाषा; ‘लक्ष्मी दर्शन’ चर्चेत
जळगाव (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीच्या प्राश्वभूमीवर शहरात पैशांच्या कथित वाटपाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मतदानाला अवघे काही तास उरले असताना, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी थेट पैशांचा उल्लेख टाळत खास ‘कोड लँग्वेज’चा वापर सुरू केल्याचे चित्र समोर येत आहे. सध्या शहरातील गल्लीबोळांत “दाणा पाठवा, तरच बगळे उडतील” हा संवाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
फोनाफोनीत कोडवर्डचा सुळसुळाट
निवडणूक रिंगणातील काही उमेदवार व त्यांचे समर्थक छुप्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी फोनाफोनी करत असल्याची चर्चा आहे. मात्र थेट पैशांचा उल्लेख न करता, शेती व पक्ष्यांच्या प्रतीकात्मक शब्दांचा वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे.
यामध्ये —‘दाणा’ म्हणजे रोख रक्कम, ‘बगळे’ म्हणजे मतदानासाठी बाहेर पडणारे मतदार किंवा सक्रिय कार्यकर्ते असा अर्थ लावला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
एका प्रभागात तर एका कार्यकर्त्याने आपल्या वरिष्ठाला फोन करून, “साहेब, दाणा संपलाय… लवकर पाठवा, तरच बगळे उडतील!” असा निरोप दिल्याची चर्चा रंगली आहे. म्हणजेच पैसे उपलब्ध झाल्याशिवाय मतदार किंवा कार्यकर्ते हलणार नाहीत, असा यामागचा संकेत असल्याचे बोलले जात आहे.
प्रति मत ‘फुली’; हजारो रुपयांची चर्चा
शहरातील काही अत्यंत चुरशीच्या व संवेदनशील प्रभागांमध्ये प्रति मत १ हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जात असल्याच्या चर्चा उघडपणे सुरू आहेत. या रकमेला काही ठिकाणी ‘फुली’, तर काही ठिकाणी ‘पाकीट’ असे संकेतात्मक नाव दिले जात आहे. मतदानाच्या आदल्या रात्रीला ‘निर्णायक रात्र’ मानले जात असल्याने, या काळात पैशांचा ओघ वाढल्याचेही बोलले जात आहे.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
कोडभाषेच्या वापरामुळे पोलिस, भरारी पथके आणि निवडणूक निरीक्षकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. थेट व्यवहार न सापडता केवळ संकेतात्मक संभाषण होत असल्याने कारवाई करताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. तरीही संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आता हा ‘दाणा’ नेमका कोणाच्या पदरात विजय टाकणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार असले, तरी मतदानपूर्व वातावरणात पैशांच्या चर्चांनी शहरातील राजकीय तापमान नक्कीच वाढवले आहे.









