चोपडा तालुक्यातील उनपदेव येथील घटना, एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यात उनपदेव येथे एका पपईच्या झाडावर गावठी कट्ट्याने फायरिंग करणाऱ्या संशयित आरोपीसह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा व ४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. हि कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.
सोशल मीडियावर एक तरुण निर्जनस्थळी गावठी कट्ट्याने फायरींग करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. फायरिंग करणारा अज्ञात असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउनि अनिल जाधव, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ हरिलाल पाटील, विष्णु बिऱ्हाडे, हेमंत पाटील, प्रदीप सपकाळे, भारत पाटील, प्रदीप चवरे यांचे पथक तयार केले. तपास सुरू असताना फायरिंग हि विशाल राजेंद्र ठाकूर (वय २८, रा. इंदिरा नगर अडावद) याने उनपदेवकडे जाणाऱ्या शेतामध्ये केल्याचे समोर आले.
गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा त्याने रोहन रवींद्र पाटील (वय ३० रा. लोणी, ता. चोपडा, ह.मु. कोनगाव भिंवडी जि. ठाणे) याच्याकडे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पथकाने भिवंडी येथील कोनगाव येथे जावून रोहन पाटील यास ताब्यात घेतले. हा कट्टा चोपडा तालुक्यातील लोणी पंचक येथे लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथून ३० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सदर कारवाईमुळे खळबळ उडाली असून तसेच चोपडा तालुक्यात सतत गावठी कट्टे मिळत असल्याने आता चिंतेचा विषय झाला आहे.