चिंचोली गावावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली येथील ११ वर्षीय बालकाचा धानवड गावाजवळील पिंपळे धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. १५ मे रोजी घडली आहे. चिंचोली येथील काही मुलांसोबत तो पोहण्यासाठी गेला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, मयत बालकाचा पाय गाळात फसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नोंद घेतली आहे.
करण जयराम पवार (वय १०, रा. चिंचोली) असे मयत बालकाचे नाव आहे. तो वडील जयराम, आई सुनीता यांचेसह मोठा १४ वर्षांचा भाऊ व अनुक्रमे १६ व १७ वर्षांच्या बहिणीसह राहत होता. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो गावातील त्याच्या काही मित्रांसह गावापासून ३ किमी असलेल्या धानवड येथील पिंपळे धरणात पोहायला गेला होता. त्याठिकाणी पोहत असताना त्याला धरणातील गाळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली.
यानंतर पोहणाऱ्या व्यक्तींना बोलविण्यात आले. ३ ते ४ तासांच्या शोधकार्यानंतर त्याचा मृतदेह मिळून आला. राहुल अभंगे, शुभम बागडे, प्रशांत घुगे, कृष्णा घुगे, विशाल ठाकरे, जितेंद्र ठाकरे आदी तरुणांनी त्याला बाहेर काढले. तत्काळ त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याठिकाणी सीएमओ डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. यावेळी करण पवार याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रुग्णालयात चिंचोली गावातल्या लोकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. मयत करण पवार याचे पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, दोन मोठ्या बहिणी असा परिवार आहे. करण याने नुकतीच इयत्ता दुसरीची परीक्षा दिली होती. वडील जयराम हे ट्रॅक्टर चालक असून आई शेतीकाम करते. तर इतर भाऊ शिक्षण करतात. दरम्यान, घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.