जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदावरचा दावा प्रबळ असला तरी आता माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे दोन तुल्यबळ नेते अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असल्याची चर्चा आहे .
जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे आता ३ डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणार आहे . त्यामुळे आतापासूनच इच्छुकांची रस्सीखेच सुरु झाली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसला १० , काँग्रेसला ३ आणि शिवसेनेला ७ जागा मिळालेल्या आहेत . भाजपची १ जागा आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या मुंबई वाऱ्या सुरु झाल्या आहेत . तथापि ही निवडणूक महाविकास आघाडी करून लढवलेली असल्याने या तीन पक्षांची कोअर कमिटी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा निर्णय घेईन असे शिवसेना आणि काँग्रेस नेते सांगत आहेत .
या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे . शेतकऱ्यांना अडचणीत जिल्हा बँकेची मदत व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे . आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांचे निर्णय कोअर कमिटी घेणार आहे , असे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सांगितले .
आधी सर्वपक्षीय पॅनल निर्मितीच्यावेळी चारही पक्षांनी अध्यक्षपद प्रत्येकी सव्वा वर्षासाठी घ्यावे अशी चर्चा झाली होती तसेच आता या तीन पक्षांनी प्रत्येकी २० महिन्यांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपद घ्यावे , अशी चर्चा होत असल्याचे सांगण्यात येत आहे .
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले की , अर्थात आम्ही आघाडीसोबत आहोत . अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांचे निर्णय कोअर कमिटी घेणार आहे . आता या तीन पक्षांनी प्रत्येकी २० महिन्यांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपद घ्यावे , अशा प्रस्तावावर चर्चा झाली आहे हा मुद्दा आधी पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जाहीरही केला होता . महाविकास आघडीचे नेते समजूतदार आहेत . आघाडी धर्म पाळून सर्वांना समान न्याय मिळेल , अशी खात्री आहे . त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाद किंवा चुरस असे काहीही होणार नाही , असेही ते म्हणाले .