बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत सन्मान
या निर्यात पुरस्कारात २०२३-२४ या वर्षासाठी प्लास्टिक आणि लिनोलियम उत्पादने अंतर्गत पीव्हीसी फोमशीट उत्पादन विभागासाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश, सुवर्ण (गोल्ड) (उलाढाल – ८७.४३) तर २०२२-२३ या वर्षासाठी प्लास्टिक आणि लिनोलियम उत्पादने अंतर्गत प्लास्टिक उत्पादने, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पीव्हीसी व एचडीपीई पाईप्स, मोल्डेड वस्तू आणि शीटस् विविध प्रकार उत्पादन विभागासाठी देखील ५१ हजार रुपयांचा धनादेश, सुवर्ण (गोल्ड) पुरस्कार देऊन गौरविले गेले. यात कंपनीने ३४२.२८ इतकी उलाढाल केली आहे. कंपनीच्या या कामगिरीस अधोरेखित करून दोन्ही वर्षासाठी सुवर्ण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. प्लास्टिक उत्पादन क्षेत्रातील लार्ज स्केल उद्योजकता आणि फोम शीट निर्मितीतील १००% निर्यातोन्मुख युनिट (EOU) या दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव यांना महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्य शासनामार्फत दरवर्षी विविध उद्योग क्षेत्रांमधील आदर्श कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या पुरस्कारांनी कंपनीचा सातत्याने गौरव होत आला आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आपल्या नाविन्यपूर्ण सिंचन समाधान, कृषी प्रक्रिया उत्पादने आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उपक्रमांद्वारे भारतासह १२० हून अधिक देशांमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. सतत संशोधन, उच्च गुणवत्ता आणि तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोन यामुळे कंपनी पर्यावरणस्नेही आणि शाश्वत विकासाला हातभार लावत, शेतकऱ्यांच्या नाशवंत मालास मूल्यवर्धन करत निर्यातीमध्ये सकारात्मक कार्य केलेले आहे. या पुरस्कारामुळे भारतीय कृषी क्षेत्राला जागतिक स्तरावर नक्कीच अधिक प्रतिष्ठा प्राप्त होईल यात तीळमात्र शंका नाही.
हा तर शेतकऱ्यांचा गौरव – अशोक जैन
या सन्मानाबद्दल आपले विचार व्यक्त करताना कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, “ हा पुरस्कार भारताच्या शेतकऱ्यांचा आणि औद्योगिक प्रगतीचा गौरव म्हणता येईल. आम्ही हा सन्मान देशातील शेतकरी बांधवांना आणि कंपनीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेल्या शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत. निर्याती बद्दल मिळालेला हा पुरस्कार जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांच्या कठोर परिश्रमांचा आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याचा सन्मान म्हणायला हवा. ‘सार्थक करूया जन्माचे रुप पालटु वसुंधरेचे’ या ध्येयवाक्यासह जैन इरिगेशनने जागतिक बाजारपेठेत निर्यातीच्या माध्यमातून भारतीय तंत्रज्ञानाचा अमिट असा ठसा उमटवला आहे. राज्य शासनाने आमच्या प्रयत्नांची दखल घेऊन दिलेला हा सन्मान आमच्या जबाबदारीत वृद्धी करणारा आणि नवे बळ देणारा ठरलेला आहे.”