जळगाव (प्रतिनिधी) : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्याचप्रमाणे जैन इरीगेशन सिस्टिम येथील जैन फूडपार्क व एनर्जीपार्क मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन मदन रामनाथ लाठी आणि जळगाव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गिरीश रमनलाल भावसार (बीएलओ) उपस्थित होते.
जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूकचे आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले आणि १३ मे रोजी पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान करुन सोबत घरातील सदस्य, आजुबाजुचे शेजारी व नातेवाईकांना विनंती करून जसे आपण उत्सव साजरे करतो त्या प्रमाणे १३ मे २०२४ रोजी हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करावा हि विनंती करून उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. बीएलओ गिरीश भावसार यांनी जिल्हाधिकारी यांच्या मतदानाविषयी लोकशाहीच्या उत्सवाचे पत्राचे वाचन केले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान प्रक्रियेत झालेल्या बदलाची माहिती दिली, मतदार यादीत नाव शोधणे, एसएमएस व ॲपचा वापर करण्यासंबंधी सुविधा समजावून सांगितली आणि उपस्थितांचे शंका निरसन केले.