शिरसोली-कुऱ्हाडदा मार्गावर रात्रभर रेती डंपरचा थरार
शिरसोली (वार्ताहर) :-शिरसोली ते कुऱ्हाडदा रस्त्यावर रात्रभर बेसुमार वेगाने धावणाऱ्या रेती डंपरमुळे स्थानिक नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. रात्रीच्या शांततेत २५ ते ३० डंपरचा होणारा मोठा आवाज आणि धुळीच्या साम्राज्यामुळे शिरसोलीकरांची झोप उडाली असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाची ‘भरारी पथके’ केवळ कागदावरच असून, तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शिरसोली आणि कुऱ्हाडदा दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज रात्री १० वाजेनंतर पहाटेपर्यंत सुमारे २५ ते ३० डंपर या मार्गावरून सुसाट वेगाने ये-जा करतात. या अवजड वाहनांच्या आवाजामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांना शांत झोप घेणे कठीण झाले आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाने ‘भरारी पथके’ नेमल्याचा दावा प्रशासनाकडून वारंवार केला जातो. मात्र, प्रत्यक्षात शिरसोली परिसरात ही पथके फिरकतच नसल्याचे चित्र आहे. तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या आशीर्वादानेच हा ‘रेतीचा खेळ’ सुरू आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भरारी पथके केवळ नावापुरतीच उरली असल्याची टीका नागरिक करत आहेत.
“रात्रीच्या वेळी होणारी ही डंपर वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, जेणेकरून आम्हाला शांत झोप मिळेल. जर प्रशासनाने याकडे लवकर लक्ष दिले नाही, तर शिरसोली ग्रामस्थ रस्त्यावर उतरून डंपर रोखून धरतील,” असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
“डंपरच्या आवाजामुळे आमची शांतता भंग झाली आहे. तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ही वाहतूक म्हणजे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून आमच्या आरोग्याशी चालवलेला खेळ आहे.” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.









