जाफराबाद (प्रतिनिधी ) तालुक्यातील टेंभुर्णी येथे कोरोना काळात प्रत्येकाला एकेका श्वासासाठी लागणारया ऑक्सिजनचे महत्त्व कळून चुकले आहे. मात्र मानवाला सर्वाधिक ऑक्सिजन देणारया वटवृक्षाची मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर व्रुक्षतोड झाली आहे. वटवृक्षाची ही तुट भरून काढण्याचा संकल्प टेंभुर्णी येथील काही महिला शिक्षिकांनी केला आहे. या महिला टेंभुर्णी व परिसरात सध्या एक शिक्षिका- एक वटवृक्ष हे अभियान राबवित आहे. या अभियानाची सुरवात त्यांनी वटपौर्णिमेला आपापल्या शाळेत आपल्या संख्येएवढी वटवृक्षाची झाडे लावून केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावात अन्य महिलांनाही या शिक्षिका वटवृक्षाचे झाड लावण्यासाठी प्रव्रुत्त करणार आहे. या अभियानामुळे भविष्यात परिसरात निश्चितच वडांच्या झाडांची संख्या वाढून मानवाला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.या अभियानाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सुखदा काळे, उषा सोळंके, रंजना सांगळे, सुनिता देशपांडे, सविता दिवटे, कविता उदावंत आदिंनी पुढाकार घेतला आहे.
महाकाय वटवृक्ष ठरले सडकेचे बळी- उषा सोळंके, शिक्षिका
काही वर्षांपूर्वी जाफराबाद- जालना सडकेच्या दुतर्फा वडाची महाकाय झाडे सडकेची शोभा वाढवित होती. मात्र सडकेच्या रूंदीकरणाच्या वेळी ही झाडे सडकेची बळी ठरली. आज या महाकाय वटवृक्षांंच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. तेंव्हा सडकेच्या दुतर्फा पुन्हा वटवृक्षाची लागवड करण्याची मागणी जनतेतून होत आहे. एकेकाळी ठिकठिकाणी दिसणारी मोठमोठी वडाची झाडे आज शोधूनही सापडत नाही. इतकेच काय तर वटपौर्णिमेलाही महिलांना वडाच्या झाडाच्या शोधात परिसर पिंजून काढावा लागतो. या प्रुथ्वीला सर्वाधिक ऑक्सिजन पुरविणारया वड, पिंपळ या व्रुक्षांचे संगोपन व संवर्धन होणे गरजेचे आहे. यामुळेच आम्ही मैत्रिणी वटवृक्ष लागवडीसाठी महिलांना प्रव्रुत्त करणार आहोत.