भुसावळ शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जादा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून भुसावळ शहरातील एकाला भामट्याने तब्बल ३४ लाखांची आर्थिक ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेडिंग ग्रुपला जॉइंट करून भरपूर नफा कमावण्याचे आमिष दाखवून सायबर ठग लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक करीत आहेत. ऐश्वर्या आणि ज्योती नावाच्या सायबर ठगांनी भुसावळ येथील एका ५० वर्षीय व्यापाऱ्याला चक्क ३४ लाख रुपयांना ऑनलाइन चुना लावला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने कैफियत मांडली. त्यानुसार शुक्रवारी दि. १३ डिसेंबर) सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
१ जानेवारी २०२४ पासून वेळोवेळी तक्रारदार यांच्याशी ऐश्वर्या तसेच ज्योती या नावाच्या ठगांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधला. ट्रेडिंगसंबंधी रक्कम गुंतवणूक करण्यासाठी उत्तम संधी असत्याचा आव आणला. यासाठी बीसीपी विक्रम फन कम्युनिकेशन ग्रुप ५२५ या ग्रुपच्या माध्यमातून भिसी पार्टनर म्हणून अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला. तसेच अकाउंट डिपार्टमेंटच्या ज्योती हिने वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपला जॉइन करण्याची गळ घातली. या ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करून भरपूर नफा मिळवून देण्याची लालुच देऊन खोट्या बाता खऱ्या असल्याचा आव आणला.
विश्वास संपादन केल्यानंतर या दोघा ठगांनी तक्रारदार यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण ३४ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन स्वीकारली. त्यानंतर भामट्याने तक्रारदार यांना कुठलाही परतावा दिला नाही. तक्रारदार यांनी संपर्क साधला असता समोरून कोणताही प्रतिसाद दिला नाही व मुद्दल रकमेतून रुपयाही दिला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याची त्यामुळे खात्री झाली. फिर्यादीने तक्रार दाखल झाल्यावर गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करत आहेत.