गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील विद्युत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी प्रकल्प यशस्वीरित्या विकसित करून विद्युत क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.‘आयओटी आधारित ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल सिस्टीम’ हा प्रकल्प विद्युत ऊर्जा कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रकल्पाची कार्यपद्धती: विद्युत प्रणालीमध्ये पॉवर फॅक्टर म्हणजे उर्जेच्या कार्यक्षमतेचा एक महत्त्वाचा मापक घटक असतो. कमी पॉवर फॅक्टरमुळे उर्जा अपव्यय, उपकरणांचे आयुष्य कमी होणे आणि वीज बिलात अनावश्यक वाढ अशा समस्या निर्माण होतात.या समस्येवर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) तंत्रज्ञानाचा वापर करून एक स्मार्ट आणि स्वयंचलित प्रणाली विकसित केली आहे.या प्रकल्पात मायक्रोकंट्रोलर, सेन्सर्स, कॅपेसिटर बँक आणि वायफाय मॉड्यूल चा वापर करून यंत्रणा तयार करण्यात आली आहे. पॉवर फॅक्टरची सतत मोजणी केली जाते आणि आवश्यकतेनुसार कॅपेसिटर बँक आपोआप कार्यान्वित होते. संपूर्ण डेटा क्लाउडवर पाठवून रिमोट मॉनिटरिंग सुद्धा शक्य होते.उद्योग आणि समाजासाठी उपयुक्तता:ही प्रणाली केवळ औद्योगिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून वाणिज्यिक आणि घरगुती वापरासाठीही उपयुक्त ठरते. यामुळे उर्जेची बचत, वीजबिलात घट, उपकरणांचे दीर्घायुष्य आणि पर्यावरणपूरक कार्यप्रणाली यांना चालना मिळते. याशिवाय स्मार्ट ग्रिड आणि स्मार्ट सिटी संकल्पनाही यामुळे अधिक सक्षम होऊ शकते.विद्यार्थ्यांचे कौतुक व भविष्यातील संधी:या प्रकल्पामुळे विद्यापीठ आणि औद्योगिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.
या प्रकल्पात केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे तर प्रॉब्लेम सॉल्विंग स्कील, टीमवर्क आणि डिजिटल कौशल्य यांचा उत्कृष्ट समन्वय साधला गेला आहे. भविष्यात याच संकल्पनेवर आधारित स्टार्टअप स्थापन होण्याचीही मोठी संधी आहे.या यंत्रणेची निर्मिती प्रदीप धोबी, पूजा हिरे आणि मनीष पाटील या विद्यार्थ्यांनी केली असून, प्रकल्प मार्गदर्शन प्रा. महेश पाटील (विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी) यांनी केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रोत्साहन दिले, तर शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या यशाबद्दल गौरव व्यक्त केला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी अशा सर्जनशील कल्पना विकसित करत समाजहितासाठी तांत्रिक उपाय शोधावेत, हीच गोदावरी फाउंडेशनची प्रेरणा आहे.