जळगावात पहिल्या टप्प्यात लावली २५० रोपे
शहरात वस्ती वाढत असल्याने वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करावे व हिरवळ निर्माण करावी या हेतूने इनरव्हील क्लब ऑफ ईस्टतर्फे मेहरूण तलाव परिसरात मियावाकी फॉरेस्ट हा उपक्रम सुरु करून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलण्यात आले आहे. ग्रीन सिटी फाउंडेशनच्या मदतीने हा उपक्रम पुढील तीन वर्ष राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अडीच झाडे लावण्यात आली असून या उपक्रमाची सुरवात डिस्ट्रिक्ट चेअरमन रमा गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यावेळी क्लबच्या अध्यक्षा सिमरन पाटील, सचिव रितू शर्मा, डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट कमिटीचेअर पीडीसी संगीता घोडगावकर, पाटील जैन, रोटेरियन संदीप शर्मा, ग्रीन सिटीचे विजय वाणी यांची उपस्थिती होती. डिस्ट्रिक्ट चेअरमन रमा गर्ग यांनी हा उपक्रम राबवितांना प्रत्येकाने आपल्या मुलांप्रमाणे झाडांची काळजी घ्यावी व तीन वर्षात हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखविण्याचे आवाहन केले. मेहरूण परिसरात तयार करण्यात आलेल्या या मियावाकी उपक्रमात लावण्यात येणाऱ्या प्रत्येक झाडाची काळजी घेण्याकरिता तीन वर्षाचा आराखाडा तयार करण्यात आला असून यात झाडांना वेळेवेळी फवारणी करणे, खत-पाणी देणे, त्यांची काळजी घेणे यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यासोबतच क्लबच्या प्रत्येक सदस्याकडून झाडांचे नियमीत पाहणी करण्यात येणार आहे. दरम्यान तीन वर्षात याठिकाणी घनदाट जंगल तयार तयार होईल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे क्लबकडून सांगण्यात आले.