चाळीसगाव – पाचोरा तिसऱ्या रेल्वे लाईन दरम्यान होणार निरीक्षण
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव-पाचोरा तिसऱ्या रेल्वे लाईन विभागाच्या संरक्षात्मक तपासणीसाठी मुख्य संरक्षा आयुक्त (कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी), सेंट्रल सर्कल यांचे निरीक्षण ०४ आणि ०५ मार्च रोजी होणार आहे. या तपासणी अंतर्गत इंजिन स्पीड चाचणी नियोजित करण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान उच्च वेगाने इंजिन चाचणी केली जाणार असल्याने या रेल्वे मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन सर्व नागरिक, स्थानिक रहिवासी, पशुपालक व गावकरी यांना आवाहन केले आहे. त्यांनी रेल्वे मार्गाजवळ जाणे टाळावे. रेल्वे लाईन ओलांडू नये, कारण हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पशुपालकांनी आपल्या जनावरांना रेल्वे ट्रॅकजवळ चरण्यास सोडू नये. रेल्वे मार्गावर कोणतेही अडथळे (वस्तू, गाडी, मलबा इ.) निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील सर्व गावांतील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे सेफ्टी चाचणी सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.