कैरो ( वृत्तसंस्था ) – दरवर्षीच्या तुलनेत यंदा अचानक विंचवांच्या दंशाचे प्रमाण इजिप्तमध्ये चार पटींनी वाढल्याने लोकांनी स्वतःचा बचाव करावा म्हणून संचारबंदी लागू केल्यासारख्या सूचना तेथील जनतेला सरकारकडून देण्यात आल्या आहेत .!
इजिप्तचं नाव घेतलं तर समोर उभे राहतात पिरॅमिड आणि नजर जाईल तोवर वाळवंट. पण याच इजिप्तची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे विंचू. पिरॅमिडच्या आत काढलेल्या भित्तीचित्रांवर आणि हजारो वर्ष जुन्या दस्तऐवजातही विंचू दिसला नाही असं होत नाही. आतापर्यंत इजिप्तमध्ये 500 हून अधिक लोकांना विंचवाने दंश मारला आहे, ज्यातील 3 लोकांचा मृत्यूसुद्धा झाला . वादळ, वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे वाळूखाली, दगडाखाली लपलेले विंचू बाहेर पडताहेत,
सर्वाधिक भयानक परिस्थिती आहे अस्वान शहराची. जिथं विंचवांचं बाहेर पडण्याचं आणि लोकांना दंश करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. इथलं सरकारी वृत्तपत्र अल-अहरामने शनिवारी विंचू चावल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध केली विंचू चावल्याने पाचशेहून अधिक लोक आजारी पडले.
12 नोव्हेंबररोजी, अस्वान आणि आसपासच्या भागात जोरदार वादळ आलं. पाऊस आणि पुरामुळे जमिनीखाली पाणी शिरलं आणि विंचू बाहेर आले. राज्यपाल अश्रफ अथिया यांनी सांगितले की, आताही 80 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. 3000 हून अधिक अँटीवेनम औषधे रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आली आहेत. विंचूंचे सर्वाधिक दंश ग्रामीण भागात झाले आहेत. दुसरी भीती सर्पदंशाची देखील आहे,
अश्रफ म्हणाले की, पावसाळ्यानंतर विंचू चावण्याच्या घटना घडत असतात, मात्र यंदा ही प्रकरणं चौपटीने वाढली आहेत. बहुतेक प्रकरणं ग्रामीण भागातून येत आहेत, जी तांबड्या समुद्राच्या आसपासची आहेत. डोंगरावर पाण्याचा प्रवाह वेगवान असतो, तेव्हा विंचूंच्या बिळांमध्ये पाणी भरतं आणि ते निवासी भागात येतात. आस्वानच्या रस्त्यांवर साचलेले पाणी काढण्यासाठी पंपिंग सेट बसवण्यात आलेत,विंचवांच्या या सामूहिक हल्ल्याची माहिती नसलेले लोक जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचू लागले, तेव्हा प्रशासनाची अवस्था दयनीय झाली.
जागतिक हवामान बदलामुळे इजिप्तसारख्या कोरड्या प्रदेशातही अतिवृष्टी होत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगताहेत. राज्यपाल अश्रफ अथिया यांनी अस्वानमध्ये लोकांच्या हालचालींवर बंदी घातली आहे. कारण खराब हवामानामुळे दृश्यमानताही कमी असते आणि त्यातच विंचूंचे हल्लेही झाले आहेत. लोकांना उघड्यावर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरांमध्येच राहा. सध्या जंगली, डोंगराळ आणि हिरव्यागार भागात जाणे टाळा. तसेच रस्ते आणि महामार्गांपासून दूर राहा. विंचवाच्या दंशापासून वाचण्यासाठी मजबूत शूज घाला असा सल्ला देण्यात आला आहे.