लखनऊ, ;- उत्तर प्रदेशातील कानपुरमधील गँगस्टर विकास दुबेचे यूपी एसटीएफने शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर केले. दरम्यान, विकास दुबे चकमकी प्रकरणात यूपी एसटीएफने निवेदन जारी केले आहे.
एसटीएफच्या म्हणण्यानुसार, “आरोपी विकास दुबे याला एसटीएफ उत्तर प्रदेश लखनऊच्या पथकाने पोलीस उपअधीक्षक तेज बहादुर सिंह यांच्या नेतृत्वात सरकारी वाहनातून आणले होते. प्रवासादरम्यान, कानपूर नगर जिल्ह्यातील साचेंडी पोलीस स्टेशन परिसरातील कन्हैया लाल हॉस्पिटल समोर पोहोचला होता. त्यात अचानक गायी आणि म्हशींचा कळप रस्त्यावर आला. प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तानुसार, अचानक झालेल्या अपघातात वाहनात बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि या घटनेचा फायदा घेत गँगस्टर विकास दुबे पळण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने निरीक्षक रमाकांत पचौरी यांचे सरकारी पिस्तूल खेचून घेतले आणि दुर्घटनाग्रस्त सरकारी वाहनांतून बाहेर पडून कच्च्या मार्गावर धावायला लागला.
यापूर्वी कानपूरचे एसएसपी दिनेशकुमार पी यांनी सांगितले की विकास दुबे याला घेऊन येणाऱ्या गाड्याच्या ताफ्याच्या मागे काही वाहने होती. ते सतत पोलिसांच्या ताफ्याला फॉलो करीत होती. ज्यामुळे चालक गाडी वेगाने चालविण्याचा प्रयत्न करीत होता. पाऊस जोरदार असल्याने अचानक वाहन पलटले. एसएसपीच्या म्हणण्यानुसार या संधीचा फायदा घेत विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. आमचे एसटीएफ जवान मागून या वाहनचा पाठलाग करत होते. त्यात विकास दुबेने पोलिसाकडून एक बंदूक खेचून घेतली. आणि फायरिंग करू लागला त्यातच पोलिसांनी चालवलेल्या गोळ्यांमध्ये त्याचा मृत्यू झाला.