जळगाव शहरात मेहरूण तलावात दुर्घटना ; रुग्णालयात प्रचंड आक्रोश
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात मुस्लिम धर्मीय बांधवांमध्ये बकरी ईदचा उत्साह असताना मेहरूण तलावामध्ये पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. ७ जून रोजी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनावर नागरिकांनी संताप केलेला घटनास्थळी पाहायला मिळाला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोहम्मद नदीम शेख गनी (वय २४, रा. तांबापुरा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. आई-वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.(केसीएन)मेकॅनिक काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शनिवारी बकरी ईदचा सण असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. अशातच नदीम शेख हा त्याच्या काही मित्रांसह मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. यावेळी मित्रांनी आजूबाजूला असलेल्या नागरिकांना बोलावले. तसेच महानगरपालिकेच्या यंत्रणेला देखील काही नागरिकांनी फोन केला.
मात्र त्या ठिकाणी वेळेवर प्रशासन आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीमच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. मेहेरुण तलावाचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.