हाँगकाँग ( वृत्तसंस्था ) – हाँगकाँगमध्ये रहस्यमय आजाराची साथ पसरली आहे. या साथीमध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. सात जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने लोकांना गोड्या पाण्यातील मासे आणि सी फूडसंदर्भात इशारा दिला आहे.
हाँगकाँगमधील मासळी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात माशांची खरेदी विक्री होते. याच ठिकाणाहून बॅक्टेरियल इन्फेक्शनचा प्रसार झाला आहे. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन या हाँगकाँगमधील आरोग्य विषय संस्थेने ज्या विषाणूमुळे सात जणांचा मृत्यू झालाय तो विषाणू कोणता आहे याबद्दल खुलासा केला आहे
मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना एसटी २८३ स्ट्रेनच्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला होता हा संसर्ग ३२ जणांना झाल्याचं सांगण्यात आलं आहे. माशांच्या माध्यमातून हा संसर्ग झाल्याची शक्यता असल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या शरीरात या विषाणूने कसा शिरकाव केला याचा तपास केला जात आहे. संसर्ग झालेल्यांपैकी अनेकजण मासेमारी करणारे असून ते साध्या हातांनी मच्छी हाताळायचे. काहीजण तर जखमा असतानाही मासे हाताळत असल्याने तिथून संसर्ग झाल्याची शक्यता आहे
या विषाणूचा संसर्ग झाल्यास रक्त, हाडं, फुफ्फुसांच्या क्रियांवर परिणाम होतो. या विषाणूचा संसर्ग लहान मुलं, वयस्कर व्यक्ती किंवा पूर्वीपासून एखादा आजार असणाऱ्यांसाठी घातक ठरु शकतो.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे चीनने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनने अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं असून काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे.
चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरांमध्ये वेगाने फैलाव होत आहे. बाहेर आलेल्या काही प्रवाशांना यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे.अनेक पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत. घराबाहेर पडणाऱ्यांना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. चीनमध्ये गेल्या २४ तासाच १३ नवे रुग्ण आढळले आहेत.