दहिगाव ता. यावल :- पावसाळ्यात किटकजन्य व जलजन्य आजार उद्भभवत असतात. हिवताप विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी आरोग्य विभागामार्फत जून महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार व जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात तसेच ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व यावल – रावेर चे ता. हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात १ ते ३० जून २०२१ यादरम्यान हिवताप प्रतिरोध महिना साजरा करून जनजागृती करण्यात येत आहे.
या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, डॉ. गौरव भोईटे, आरोग्य सहाय्यक एल जी तडवी, व प्रयोगशाळा तंत्रज्ञ कल्पेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडासिम प्रा. आ. केंद्राच्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रात व गावात आरोग्य सेवक हे सर्वेक्षण व जनजागृती करीत आहेत.
दहिगाव येथे राजेंद्र बारी, सावखेडासिम येथे संजय तडवी, मोहराळा येथे बालाजी कोरडे, सातोद, व कोळवद येथे भुषण पाटील, तर आदिवासी व अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेले गाड्रया – जामन्या येथे अरविंद जाधव हे सर्व आरोग्य सेवक आशा सेविका सह प्रत्येक गावात कंटेनर सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, ग्रामपंचायत कडून गटारी वाहत्या करणे, पाण्याची डबकी बुजने किंवा वाहती करणे किंवा क्रुड ऑईल टाकणे, प्रत्येक आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, माहिती पत्रके वाटणे, भिंतीवर म्हणी लिहिणे, तापाच्या रुग्णाचे रक्त नमुने घेऊन औषध उपचार देणे, व गट सभा घेऊन नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे. अशा प्रकारे हिवताप, डेंगू, व चिकनगुनिया या किटकजन्य आजारांना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून व जनजागृती करून हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे.