जामनेर तालुक्यात प्रशासनाने दिला १४० शेतकऱ्यांना दिलासा
जामनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील सर्व शिव पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली असून त्या योजनेचा शुभारंभ आज मंगळवारी जामनेर तालुक्यात करण्यात आला आहे. मौजे हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु असा शिव पाणंद रस्ता उपविभागीय अधिकारी विनय गोसावी व तहसीलदार, जामनेर नानासाहेब आगळे यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी तोंडापूर व ग्राम महसूल अधिकारी, तोंडापूर यांनी मोकळा केला आहे.
संबंधित गावचे ग्राम विकास अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील तसेच शेतकरी ग्रामस्थ यांचे मदतीने सदरचा शिव पाणंद रस्ता अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात येऊन सदरचा रस्ता शेतकरी बांधवांसाठी खुला करण्यात आलेला आहे. सदर रस्त्याचे एकूण अंतर हे अंदाजे २ किमी इतके असून अतिक्रमीत अंतर अर्धा किलोमीटर इतके आहे. सदर शिव रस्त्याचे अतिक्रमण काढल्याने या भागातील किमान १४० शेतकरी यांना याचा फायदा होणार आहे. सदरच्या मोहिमेतून सर्व शिव पाणंद रस्त्याच्या हद्दी निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतरस्ते तयार करण्यासाठी रोजगार हमी योजना व ग्रामविकास विभागाचे योजनेतून कामकाज करण्यात येणार आहे.
सदर खुले करण्यात आलेल्या शेतरस्त्यांची नोंदी गावचे नकाशावर करणेबाबत शासन स्तरावरून नियोजन करण्यात येत आहे. तसेच शेतजमिनीच्या वाटप आदेशाचे अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ चे आदेशात देखील शेत रस्त्याचा उल्लेख करणे बाबत निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत. सदर शिवरस्ता खुला केल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवानी शासनाचे आभार मानले आहे. सदरची अतिक्रमण खुले करण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी तोंडापूर विजयकुमार बागडे, ग्राम महसूल अधिकारी घुगे, ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील व शेतकरी बांधव यांचे मदतीने लोकसहभागातून करण्यात आलेली आहे.