चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे परिसरात घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मेहूणबारे परिसरात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना जामदा-मेहुणबारे रस्त्यावरील शेतशिवारात घडली. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भिती पसरली असून वन विभागाने हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
मेहूणबारे येथील शेतकरी किशोर महाजन हे शेतातच वास्तव करतात. त्यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये ३ गायी आणि चार शेळ्या बांधलेल्या होत्या. रात्री १२ वाजेनंतर हिंस्र प्राण्यांनी ४ शेळ्यांच्या फडशा पाडल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. यापूर्वीही या भागात पशुधनावर हल्ले केले असल्याने हा हल्लाही बिबट्याने केला असावा असे सांगितले जात होते. मात्र घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. त्यामुळे हा हल्ला हिंस्र प्राण्याने केला असावा असा कयास वन विभागाने वर्तविला आहे. घटनेचा वन विभागाने पंचनामा केला आहे.