अमळनेर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना प्रलंबित मानधनासह प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाचा आदेश आला आहे.त्यानुसार लवकर मानधन, भत्ता मिळावा म्हणून अमळनेरचे मुख्याधिकारी यांना अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून शासनाने अनेकविध उपाययोजना अंमलात आणल्या. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून ग्रामीण व नागरी विभागातील अंगणवाडी सेविका मदतनिसांना कोरोनाच्या कामासाठी एप्रिलमध्ये नियुक्त्या दिल्या गेल्या. सदर नियुक्त्यांनुसार अंगणवाडी कर्मचारी आजतागायत कोरोना निर्मूलनाचे काम करीत आहेत. म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी संघटनेने शासन स्तरावर लावून धरली होती. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी शासकीय आदेश काढून कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त १०००/-रुपये प्रोत्साहन भत्ता १२,१३ आणि १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेच्या व्याजातून देण्यात यावा असे नमूद केले आहे.
सदर आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करावा. अशा आशयाचे निवेदन आज संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना देऊन सविस्तर चर्चा केली. सदर चर्चेत प्रोत्साहन भत्त्याची रक्कम नियोजन करून तात्काळ अदा करण्यात येईल. असे ठोस आश्वासन दिले.शिष्टमंडळात वंदना पाटील, सुचिता पाटील, संगिता पाटील, सुनिता नेतकर, पुष्पा सोनी, कल्पना पाटील, रत्नप्रभा पवार, हेमलता लाड, प्रतिभा पाटील, ज्योती पाटील, मनिषा चौधरी, ज्योती निकम आदींनी उपस्थिती दिली.







