अमळनेर;– सध्या सर्वदूर करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लॉकडाऊन सुरू आहे . अशा परिस्थितीत देखील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी घालून त्यांचे संवर्धन केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे , कार्यकारी अभियंता श्री एम एस राजपूत यांनी दिनांक 6 मे रोजी सार्वजनिक विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष पाहणी दौरा काढून अमळनेर (बांधकाम ) उपविभागाच्या कार्यकक्षेतील रस्त्यांच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांची पाहणी केली . हे वाढीस आलेले वृक्ष पाण्यावाचून जळु नयेत म्हणून त्यांना जगविण्यासाठी उपविभागीय अभियंता, श्री. दिनेश पाटील यांना सूचना केल्या त्यानुसार दि. ८ मे रोजी अमळनेर – हेडावे- ढेकु – जांभोरा रस्ता , व अमळनेर – गांधली – अमळगाव रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना लागलीच पाण्याचा टँकरद्वारे पाणी देण्याची मोहीम हाती घेतली गेली, यावेळी शाखा अभियंता विजय व्ही.गांगुर्डे , सत्यजित गांधलीकर , एस व्ही पाटील हजर होते , तसेच परिसरातील नागरिकांना वृक्षांच्या संवर्धनाविषयी सहकार्याचे आवाहन करण्यात आले .