जळगाव ;- ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर आयोजित केलेल्या प्री-पीएच.डी. कोर्सवर्क ऑनलाईन कार्यशाळेत ९०० संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.
विद्यापीठाने पेट-२०१९ च्या अनुषंगाने तात्पूरत्या प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी प्री-पीएच.डी. कोर्सवर्क कार्यशाळेचे आठवडाभरासाठी आयोजन केले होत. यापूर्वी प्रत्यक्ष कार्यशाळा घेण्यात आल्या मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता यावेळी ही कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहूलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ऑनलाईन कोर्सवर्क शाळेचे आयोजन करण्यात आले. अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी व ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.अनील चिकाटे यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. समन्वयक म्हणून प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य पी.एम.पवार, प्राचार्य प्रदीपकुमार छाजेड, प्राचार्य अशोक राणे यांच्यासह सहयोगी अधिष्ठाता प्रा.संजय शेखावत, प्राचार्य व्ही.आर.पाटील व प्राचार्य बी.युवाकुमार रेड्डी यांनी काम पाहिले. तांत्रिक समन्वयक म्हणून डॉ.समीर नारखेडे, डॉ. मनोज पाटील व दाऊदी हूसेन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या ऑनलाईन कार्यशाळेत ९०० संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. त्यांना महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील ९१ विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे मराठी व इंग्रजी माध्यमनिहाय टेलीग्राम ग्रुप तयार करून वेळावेळी त्यांना सूचना देण्यात येत होत्या. गटनिहाय कार्यशाळा चार दिवस घेण्यात आली. त्यानंतर एक दिवस विषय व विद्याशाखानिहाय कार्यशाळा झाली. त्याचा संशोधकांना आपआपल्या विषयाच्या संशोधनाबाबत बारकाईने माहिती होण्याचा फायदा झाला व संशोधनाचे आयाम कळाले.
यावेळी प्रथमच विद्यापीठ अनुदान आयोगाने सूचविल्याप्रमाणे रिसर्च अॅण्ड पब्लिकेशन इथिक्स या विषयावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये संशोधनात इथिक्सला असलेले महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. आठवडाभर चाललेल्या या कार्यशाळेत व्यवस्थापन परिषद सदस्यांनीही भेटी दिल्या. धुळे येथील समर्थ वाग्वदेवता मंदिराचे अध्यक्ष डॉ. शरद कुबेर यांनी या केंद्रात उपलब्ध असलेले पुरातन दस्ताऐवज संशोधकांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.







