मुंबई : – धारावीत कोरोना दिवसेंदिवस पसरत आहे. धारावीत आज पुन्हा ७ नवे रुग्ण आढळले आहेत. या सात रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या ५५वर गेली असून मृतांचा आकडा ८वर गेला आहे. तिसरा मृत रुग्ण हा कोरोनाबाधित होता की नाही? हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही व्यक्ती महिला असून या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
धारावीत आज सात रुग्ण सापडले. यात दोन महिलांचा समावेश आहे. धारावीच्या कल्याणवाडीत सापदलेल्या ५२ वर्षीय रुग्णावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ११ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला होता. आज त्याचा रिपोर्ट आला. या रिपोर्टनुसार त्या व्यक्तीचा मृत्यू करोनाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजीव नगरमध्ये एका महिलेला आणि मुस्लिम नगरमध्ये एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. मुस्लिम नगरमध्ये आणखी एक करोना रुग्ण सापडला असून त्याचा सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. जनता सोसायटीत एक पुरुष आणि एका महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ५५ वर गेली आहे.