जामनेर ;- मुंबईच्या इन्व्हेस्टिगेशन कंपनीने बजरंगपुऱ्यातील किराणा दुकानात छापा टाकून १४ लाख रुपये किमतीचा १४०० गोण्या टाटा मिठाचा बनावट साठा जप्त केल्याची घटना गुरुवारी घडली. राजकुमार कावडिया यांच्या मयूर किराणा दुकानातून जप्त केलेला हा साठा पोलिस ठाण्यात जमा केला आहे. मिठाचा हा माल इंदूरहून आल्याचा इन्व्हेस्टिगेशन कंपनीला संशय आहे आणि हा तर आमच्या जीवाशी खेळ असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
डमी ग्राहक पाठवला
जामनेर येथील मयूर किराणा दुकानातून बनावट टाटा मिठाची विक्री होते अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून कंपनीने बनावट मालावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या मुंबई येथील आय.पी. इन्व्हेस्टिगेशन प्रायव्हेट लिमिटेडला माहिती दिली.
मिठाचा इंदूरहून पुरवठा; १४०० गोण्या जप्त
टाटा कंपनीच्या एक किलो पॅकिंगसारखेच बनावट पॅकिंग असलेल्या एकूण १४०० गोण्या जामनेर येथील कावडिया यांच्याकडे सापडल्या. एका गोणीत ५० पिशव्या असतात. क्यूआर कोड व प्रिंटिंगमधील रंगाचा फरक यावरून ही पॅकिंग बनावट असून तो साठा इंदूरहून आल्याचा संशय आहे. २० रुपये किमत असलेले हे पॅकिंग कंपनीने सप्टेंबरमध्ये बंद करून २१ रुपये किलोचे पॅकिंग बाजारात आणले आहे.








