हजारो विद्यार्थ्यांना दिली खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी
जळगाव (प्रतिनिधी) : स्वप्र साकार फाउंडेशन संचलित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट, जळगाव येथे गेल्या ८ वर्षांपासून पॅरामेडिकल क्षेत्रातील विविध टेक्निशियन आणि असिस्टंट कोर्सेस चालवले जात आहेत. २०१६ पासून कार्यरत असलेल्या या इन्स्टिट्यूटमध्ये १० वी, १२ वी आणि ग्रॅज्युएशननंतरच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटल क्षेत्राशी संबंधित टेक्निशियन व असिस्टंट कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि रोजगाराच्या संधी मिळतात. गरजू महिला आणि युवक-युवतींना प्रशिक्षित करून स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने इन्स्टिट्यूट कार्यरत आहे.
हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भविष्यातही हॉस्पिटल क्षेत्रासाठी उच्च दर्जाचे टेक्निशियन आणि असिस्टंट तयार करण्याचे कार्य इन्स्टिट्यूट अविरत सुरू ठेवणार आहे. तसेच, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटला आवश्य भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जळगावमधील अनेक डॉक्टर आणि हॉस्पिटल्स या संस्थेशी संलग्न आहेत. शहरात जवळपास ५०% हॉस्पिटल्स आणि मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये विविध मनुष्यबळाची, तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अशा तज्ज्ञांना प्रशिक्षित करून स्वावलंबी बनवते.
याशिवाय, भारत सरकार मान्यता प्राप्त सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (एमपीडब्ल्यू) कोर्सेस ही इन्स्टिट्यूट गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्र शासनाने या कोर्सेसला अधिकृत मान्यता दिली, आणि शासनाच्या विविध विभागांमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर पदांवर संस्थेच्या १५ विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली, ही अभिमानास्पद बाब आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे भारत सेवक समाज बोर्डाने हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटला प्रथम क्रमांकाचे नामांकन देऊन पुरस्कृत केले आहे. हॉस्पिटल क्षेत्रासोबतच खाजगी कंपन्यांमध्येही इन्स्टिट्यूटने आपली ओळख निर्माण केली आहे. जळगावमधील रेमंड आणि लिग्रंड यांसारख्या नामांकित कंपन्यांचे फर्स्ट एड सेंटर चालवण्याचे कामही हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केले जाते. औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या अचानक अपघात आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी फर्स्ट एड कोर्सद्वारे कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.