जळगाव ( प्रतिनिधी ) – एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील सुभाषवाडी येथील अशिक्षित लोकांच्या नावाने बनावट कर्ज प्रस्ताव तयार करून त्यांची फसवणूक केली आहे. या आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले .
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की , या बँकेचे २०१९ सालातील तत्कालीन शाखा व्यवस्थापक संजय चौधरी , क्लस्टर हेड अकबर बेपारे , विद्यमान शाखा व्यवस्थापक महेंद्र कुलकर्णी , विक्री व्यवस्थापक गोपाळ कोळी हे या गैरव्यवहारात संशयित आरोपी आहेत . या आरोपींच्या विरोधात ८ मार्चरोजी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र ८ महिने होऊनही काहीच कारवाई झालेली नाही पोलिसांनी गोपाळ कोळी वगळता अन्य आरोपींना मोकळे सोडले आहे. या कारवाईच्या मागणीसाठी २४ ऑगस्टरोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले होते.
या आरोपींनी सुभाषवाडी येथील अशिक्षित लोकांच्या खऱ्या कागदपत्रांचा वापर बनावट कर्ज प्रस्तावांसाठी केला आहे कर्ज प्रस्तावावरील फोटो आणि सह्या मात्र अज्ञात व्यक्तींच्या आहेत प्रार्थमिक माहितीनुसार ही ८० हजार रुपयांची फसवणूक दिसत असली तरी या आरोपींच्याविरोधात कसून चौकशी केल्यास हा फसवणुकीचा आकडा आणि फसवणूक झालेल्या लोकांची संख्या वाढलेली निष्पन्न होऊ शकते पोलिसांचे अपयश लपवण्यासाठी फिर्यादींनाच धमकावले जात असून त्यांनाच आरोपी करू अशा धमक्या दिल्या जात आहेत आता जिल्हा पेठ पोलिसांची भूमिका आणि तपासावरच फिर्यादींकडून शंका घेतली जात आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात भा द वि कलम ४२०, ४६५ , ४६७ , ४६८ , ४७१, ४७२ , ४७४ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला जावा या आरोपीवर कारवाई न झाल्यास गोर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.