एलसीबी चा यशस्वी तपास, एरंडोल तालुक्यात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील सावदे प्रचां येथील कामगार इंदल प्रकाश वाघ (वय २५, रा. जूनी भिलाटी, सावदा, ता. एरंडोल) या तरुणाचा मोठ्या भावाने संतापाच्या भरात बैलगाडीचे शिंगाडे डोक्यात टाकून खून केल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवीत संशयित दीपक प्रकाश वाघ याला अटक केली आहे.
एरंडोल तालुक्यातील सावदा येथे इंदल वाघ हा तरुण वास्तव्यास होता. त्याला दारुचे व्यसन असल्याने पती-पत्नीमध्ये भांडण होत असल्याने त्याची पत्नी चार महिन्यांपासून जामनेर तालुक्यातील भागपूर येथे निघून गेली आहे. इंदल हा खदानीत दगड फोडण्याचे काम करीत होता. (केसीएन)मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने तो दररोज दारु पिवून कुटुंबियांसोबत वाद घालीत होता. शनिवारी इंदल याने पैशांसाठी आईसोबत वाद घातला. त्याच्या त्रासाला कंटाळून आईने त्याला पैसे देखील दिले. त्यानंतर इंदल हा पुन्हा दारु पिवून घरी आला. यावेळी तो पुन्हा कुटुंबियांसोबत वाद घालू लागला.
इंदलला त्याचा मोठा भाऊ दीपक याने कानशिलात लगावली. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. तो बस स्थानकाकडे जात असतांना संशयित दीपक हा देखील त्याच्या मागे गेला. याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. या वादातून दीपक याने संतापाच्या भरात इंदल याच्या डोक्यात बैलगाडीचे शिंगाडे मारल्याने तो जमीनवर कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
दारु पिवून वाद घालणाऱ्या लहान भावाचा खून केल्यानंतर दीपक हा दिवसभर जिल्हा रुग्णालयात उपस्थित होता. तर दुसरीकडे एलसीबीचे पथक घटनास्थळी ठाण मांडून संशयिताचा शोध घेत होते. (केसीएन)मात्र एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपासाचा धागा गवसताच पथकाने संशयित दीपक वाघ याच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अमळनेर पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवालकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाशखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, गणेश वाघमारे, अनिल जाधव, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ जितेंद्र पाटील, दीपक माळी, निलेश सोनवणे, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली.