मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील महालखेडा शिवारात ३५ वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आला. महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करीत तिची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली.
मालताबाई मनोज खाडे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. ती सकाळी शेतात गेली होती.
शुक्रवार, दि. ५ एप्रिल रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या पुर्वी महालखेडा शिवारातील डाबर नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात महिलेची ओळख पटली. त्यानंतर मयत महिलेच्या अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय सुधाकर पाटील (रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पाटीलचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत महिलेसोबत याच मुद्यावरून तो वाद सुध्दा करत असायचा. याच वादातून शुक्रवारी त्याने डोक्यात दगड टाकुन, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन संबंधित महिलेचा खून केला, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.