जळगाव तालुक्यात दापोरा ग्रामपंचायतीकडून ठराव
जळगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील दापोरा गावात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू विक्रीमुळे वाढलेल्या व्यसनाधीनतेला आणि त्यामुळे घडणाऱ्या गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी आज गावातील तरुण आणि महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. अखेर ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव केला आहे.
दारूमुळे अनेक तरुण अकाली मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडत असल्याने, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दारूबंदीची मागणी केली.ग्रामस्थांच्या या एल्गारानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ महादेव मंदिरात ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेत गावात सुरू असलेली हातभट्टीची दारू कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. तसेच, दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी एक दारूबंदी समिती देखील स्थापन करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून गावात दारूच्या व्यसनामुळे भांडणे आणि इतर अनेक समस्या वाढल्या होत्या, ज्यामुळे गावातील शांतता भंग पावली होती. अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपले जीवन गमावत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांनी, तरुण आणि महिलांनी गावात हातभट्टीची दारू कायमस्वरूपी बंद करून व्यसनाधीनता थांबवावी अशी एकमुखी मागणी केली. सरपंच गोविंदा तांदळे यांनी ग्रामस्थांच्या या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवला. ग्रामपंचायत प्रशासनाकडे हातभट्टीची दारू कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आणि कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनात गावातील ग्रामस्थ, तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे दारूबंदीच्या मागणीला एक मजबूत पाठिंबा मिळाला.