जागर स्वच्छतेचा चित्ररथाद्वारे करण्यात येत आहे जनजागृती
जळगाव (प्रतिनिधी) – सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहता स्वच्छता महत्वाची आहे. कोविड-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी हात स्वच्छ असणे आवश्यक आहे. याकरीता वारंवार हात स्वच्छत हात धुणे निकडीचे आहे. ही बाब लक्षात घेऊन तसेच जागतिक हात धुवा दिवसाचे निमित्त साधून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सुचनेनुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हीस ऑर्गनाएझेशन यांच्या सौजन्याने स्वच्छता रथासह पथनाट्याच्या माध्यमातुन आणि दृकश्राव्य पध्दतीने प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर करुन जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
चित्ररथाद्वारे चोपडा, अंमळनेर, पारोळा या तालुक्यात जनजागृती करुन येऊन हात धुवा प्रात्यक्षिक व रॅली आदि उपक्रम स्वच्छता रथासोबत राबविण्यात आले. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री. बी. एन. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) श्री. दि. रा. लोखंडे यांनी जनतेला स्वच्छता संदर्भात केलेले आवाहन मार्गदर्शनपर ठरत आहे. तसेच सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हीस ऑर्गनाएझेशन यांचे सदस्यांमार्फत हात धुण्याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांना शास्त्रशुध्द हात धुण्याची पध्दत कळत आहे.
चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हाभरात 23 ऑक्टोबर पर्यंत हात धुवा विषयक जनजागृती करण्यात येणार असून हा चित्ररथ जिल्हाभरातील प्रमुख शहरांमध्ये जाऊन नागरीकांमध्ये जनजागृती करीत आहे. तसेच पथनाट्याच्या माध्यमातूनही स्वच्छतेचे महत्व विशद केले जात आहे. या उपक्रमास नागरीकांनी कोरोनाबाबत शासनाचे निर्देश पाळून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) श्री. दि. रा. लोखंडे यांनी केले आहे.







