नगरदेवळा पोलिसांची तत्परता
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील नगरदेवळा पोलिसांनी कमालीची संवेदनशीलता आणि कार्यतत्परता दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाचा हरवलेला मोबाईल अवघ्या तीन तासांच्या आत शोधून काढला आहे. यामुळे संबंधित ज्येष्ठ नागरिकाला मोठा दिलासा मिळाला आहे.


नगरदेवळा येथील रहिवासी हिरालाल परदेशी हे ‘लक्ष्मीबाई पवार सार्वजनिक वाचनालयात’ गेले होते. तेथे ते आपला मोबाईल विसरले. काही वेळाने मोबाईल जवळ नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वाचनालयात धाव घेत शोध घेतला, मात्र मोबाईल सापडला नाही. त्यांचा मुलगा बाहेरगावी नोकरीला असल्याने, त्याच्याशी संपर्क साधण्याचे ते एकमेव साधन होते. मोबाईल हरवल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते.
परदेशी यांनी तात्काळ माजी सरपंच प्रकाश परदेशी व सोनु परदेशी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नगरदेवळा पोलीस दूरक्षेत्रात जाऊन पोलीस कर्मचारी दिनेश पाटील यांच्याकडे तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राहुल पवार व उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या तीन तासांच्या आत पोलिसांनी तो मोबाईल शोधून काढला आणि सन्मानाने हिरालाल परदेशी यांना परत केला.
पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि मानवी दृष्टिकोनातून केलेल्या कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. या कामगिरीत पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता. यात राहुल पवार (पोलीस निरीक्षक), योगेश गणगे (उपनिरीक्षक), निवृत्ती मोरे (सहाय्यक फौजदार), दिनेश पाटील (पोलीस नाईक), मजीद पठाण यांनी कार्यवाîही केली.









