मनवेल ता.यावल;- येथे गेल्या काही दिवसांपासून जंगली पिसाळलेल्या माकडांनी उच्छाद मांडला असून हे माकडे नागरिकांच्या अंगावर धावून जात आहे.गावातील लहान मुलांना व गुराढोरांना चावा घेणे,बोचकणे असे प्रकार घडत आहे.दरम्यान या पिसाळलेल्या माकडांच्या हल्ल्यात गावातील एक पाच वर्षाचा मुलगा तसेच एक गाय गंभीरपणे जखमी झालेली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या माकडांचा वनविभागाकडून त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरीत आहे.
साकळी गावात गेल्या काही दिवसांपासून काही जंगली माकडे आलेले असून ही माकडे गावातील गल्लीबोळात बिनधास्तपणे फिरत आहे.ते कधी कोणाच्या घराच्या गच्चीवर तर कोणाच्या ओट्यावर अंगणात, अंगणातील झाडांवर बसत आहे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुक्तपणेअसा संचार करीत आहे. गावातील लोकही या माकडांना खायला देत आहे तर माकडांना पाहण्यासाठी लहान मुले गर्दी करत आहे व आपले मनोरंजन करीत आहे. मात्र या माकडांनी गावात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना भंयकर असा त्रास देणे सुरू केलेले आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांवर हल्ला करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असल्याचे दिसून येत आहे.
साळी प्लॉट भागातील रहिवाशी असलेल्या कुंदन इंदर बेलदार (वय- ५ वर्ष ) या मुलावर दुपारच्यावेळी अंगणात खेळत असतांना अचानकपणे एका माकडाने त्यामुलावर गंभीरपणे हल्ला केला. त्यावेळी हा मुलगा आपला जीव घेऊन पळत असतांना या मुलाच्या पायाला माकडाने पकडून बोचकले आहे व चावा घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. माकडाच्या हल्ल्यात सदर मुलगा गंभीर जखमी झालेल्या असून त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्याच्यावर साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहे.