जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील सिद्धार्थ नगरात जुन्या भांडणाचे कारण उकरून काढत तिघांनी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा हुडको येथील रहिवासी यश दत्तू बिऱ्हाडे (वय २१) हा तरुण त्याच्या आई-वडील कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. सोमवारी दि. ७ रोजी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या गल्लीतील श्याम चिंधा बागडे, राम चिंधा बागडे आणि तुळसाबाई यांनी मागील भांडण उकरून काढून वाद घातला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन तिघांनी बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी तरुणाच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक राजेश चव्हाण तपास करीत आहेत.