महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन वेधले लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग बांधवांना हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी आज शुक्रवारी दि. २५ एप्रिल रोजी विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत महापालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात संस्थेने शासनाच्या घरकुल योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून जळगाव शहरात वास्तव्य करत असलेल्या दिव्यांग आणि निराधार लोकांना स्वतःचे घर नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांना लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दिव्यांग बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण आहे आणि त्यात स्वतःचे घर नसल्याने त्यांचे जीवन अधिकच संघर्षमय झाले आहे. घरकुल मिळाल्यास त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. फक्त घरकुलच नव्हे, तर दिव्यांग बांधवांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी संस्थेने केली आहे. यामध्ये नियमित धान्य पुरवठा आणि लाईट बिलामध्ये सवलत यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.