शनिपेठ पोलीस स्टेशनची तिघांवर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून शहरात वास्तव्य करणाऱ्या २ आरोपींना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेजस दिलीप सोनवणे आणि सागर उर्फ बीडी सुरेश सपकाळे यांना अटक करण्यात आली आहे. यातील आणखी एका प्रकरणात, एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत हद्दपार झालेला आरोपी स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर हा देखील गावठी पिस्तुलसह आढळून आला होता.

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे तेजस दिलीप सोनवणे आणि सागर उर्फ बीडी सुरेश सपकाळे यांना अनुक्रमे उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव आणि पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी विशिष्ट कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. असे असतानाही, हे आरोपी कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय त्यांच्या घरी वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक कमलाकर यांनी आपल्या पथकासह, ज्यात गणेशकुमार नायकर, दिपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी आणि काजोल सोनवणे यांचा समावेश होता.
पथकाने आरोपींच्या घरावर छापा टाकला. यावेळी दोन्ही आरोपी घरातच मिळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ७ ऑगस्ट २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आलेला स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर हा शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.एन.सी. कॉलेज परिसरात गावठी पिस्तुलसह दहशत माजवत असल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर शस्त्र अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









