एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळ एक तलवार आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे.
विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच तर रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असलेल्या विशाल दाभाडे याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. तरीदेखील तो शहरात फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक योगेश बारी, सुधीर सावळे, पोकॉ. नितीन ठाकूर, मुकेश पाटील, नाना तायडे, किरण पाटील यांनी ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी रामेश्वर कॉलनी परिसरातून विशालला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे एक लोखंडी तलवार आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. विशालला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.