चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाघळी ते हिंगोणे रोडवर पोलिसांनी ४ लाखांचा अवैध गुटखा पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पो.ना. शांताराम पवार आणि त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना हा अवैध गुटखा व पानमसाला त्यांनी पकडला . कारवाईनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अजय नारायण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रात्री २ वाजेच्या सुमारास वाघळी ते हिंगोणे रोडवर पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना अजय पाटील (रा. हनुमान वाडी, ता. चाळीसगाव) त्याच्या अशोक लेलँड कंपनीच्या मालवाहू गाडीतून ( क्र. एम. एच. १९ सीवाय ४१४८ ) गुटखा वाहतूक करताना मिळून आला. ४ लाख रुपये किमतीचा गुटखा व ५ लाख रुपये किंमतीचे वाहन असा ९ लाख २३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.ना. शांताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अजय पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण करीत आहेत.