होमिओपॅथी पदवीधरांना नोंदणीची परवानगी
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयाच्या निषेधार्थ, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जळगाव शाखेने गुरुवारी दि. १८ सप्टेंबर रोजी एकदिवसीय राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडी आणि रुग्णालये पूर्णपणे बंद राहणार आहेत. यात आपत्कालीन (इमर्जन्सी) सेवांचाही समावेश असेल, अशी माहिती आयएमएने दिली आहे.
शासनाने ५ सप्टेंबर, २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (CCMP) धारक होमिओपॅथी पदवीधरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आयएमएने या निर्णयाला ‘मिक्सोपॅथी’ला दिलेले अधिकृत आमंत्रण म्हणत तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, यामुळे रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वी दि. ११ जुलै, २०२४ रोजी शासनाने अशा नोंदणीला स्पष्टपणे मनाई केली होती. आता अचानक घेतलेला हा ‘यू-टर्न’ धक्कादायक असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.
हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याआधीच शासनाने हा निर्णय घेणे हा कायदेशीर प्रक्रियेचा अपमान असल्याचेही आयएमएने म्हटले आहे.आयएमएने या संपामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी हे पाऊल भविष्यात रुग्णांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची अखंडता टिकवण्यासाठी उचलले असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व नागरिकांनी या परिस्थितीत सहकार्य करावे आणि आपल्या भूमिकेला समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. संपकाळात नागरिकांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास, त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयाशी किंवा सार्वजनिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.