जळगाव (प्रतिनिधी) – एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे माजी विधानपरिषदेचे आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे उपरणे टाकून त्यांचे स्वागत केले.

एकनाथराव खडसे यांच्यासोबत नेमकं कोण प्रवेश घेणार याबाबत उत्सुकता होती. या अनुषंगाने आज झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर गुरुमुख जगवाणी यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला डॉ.गुरुमुख जगवाणी हे विधान परिषदेवर दोनदा निवडून गेले होते ते एकनाथराव खडसे यांचे अत्यंत कट्टर समर्थक समजले जातात.
डॉ.गुरुमुख जगवाणी यांनी आजवर आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. यामुळे ते भाजपमध्ये राहणार की, नाथाभाऊ सोबत जाणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेत एकनाथराव खडसे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.







