घटना छ. संभाजीनगर जिल्ह्यातील, तर संशयित आरोपी जामनेरचा
जळगाव (प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेच्या शिक्षकानेच चक्क विद्यार्थीनीलाच पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुरुजी विद्यार्थिनींसह अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा शिक्षक जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील आहे.
मुलीच्या आईने याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी महेंद्र त्र्यंबक साठे (वय ४१,रा. पळसखेडा ता. जामनेर, जळगाव, हल्ली मु. करमाड ता. जिल्हा औरंगाबाद) हा एका शाळेत शिक्षक आहे. शाळेतील १७ वर्षीय विद्यार्थिनीला त्याने एमएससीआयटी कोर्सचा क्लास लावायला सांगितल्याची माहिती मिळत आहे. १२ जून रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास लाडसावंगी बायपास रोड येथून या शिक्षकाने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी करमाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक पुजा नांगरे व पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामेश्वर ढाकणे, सफौ. जगताप, पोलीस नाईक दादा पवार करीत आहेत. दरम्यान हे मुलगी अल्पवयीन असतानाही शिक्षकाने पळवून नेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. करमाड पोलीस दोघांचा कसून शोध घेत असून त्यासाठी त्यांनी पथक कामाला लावले आहेत.