जळगाव ( प्रतिनिधी ) – रिपाइं ( आठवले गट ) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांची सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांमधून बदनामी करून लोकांची दिशाभूल केली म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याविरोधात जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .
याबद्दल रिपाइं ( आठवले गट ) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल म्हणाले की , पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असली तरी आता मी दीपककुमार गुप्ता यांना न्यायालयात खेचणार आहे . माझे विनाकारण प्रतिमाहनन केल्याने अब्रुनुकसानीचा दावा करतानाच माझ्याकडे त्यांच्याविरोधात असलेले पुरावे देऊन कायद्याने त्यांना धडा शिकवीन . माझ्याविरोधात २६ मार्च , १९९९ रोजी भा द वि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या खटल्यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने माझी २०१२ साली निर्दोष मुक्तता केली आहे. हे माहिती असूनसुद्धा दीपककुमार गुप्ता यांनी माझी विनाकारण बदनामी केली आहे . ते स्वतःला कायद्याचा मोठा अभ्यासक समजतात का ? आज माझ्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात भा द वि कलम ५०१ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे .