जळगाव (प्रतिनिधी) – आज मराठी शाळांसमोर पटसंख्या आणि गुणवत्ता सातत्याचे आव्हान आहे. शिक्षण संस्था आणि शाळेत समन्वय असल्यास ही आव्हाने सहजपणे पार करता येतात. भादली येथील रूरल एज्युकेशन सोसायटीने आजवरच्या वाटचालीतून हेच सिध्द केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते रूरल एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिपल बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, जि.प.चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, पं. स. सदस्या जागृती चौधरी, सरपंच मिलिंद चौधरी, उपसरपंच अरुण सपकाळे, गटशिक्षण अधिकारी सतीश चौधरी, तुषार महाजन, वि. का. सोसायटी चे चेअरमन किरण रडे, दूध डेअरी चेअरमन मनोहर महाजन, छगन खडसे, आबा कोळी, सुभाष महाजन उपस्थित होते.
शाळेच्या बालभवन गीत मंचाच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रूरल एज्युकेशन संस्थेच्या अमृत महोत्सवाचे दीप प्रज्वलन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन गोविंद महाजन व सेक्रेटरी सुनिल नारखेडे यानी ७५ वर्षाच्या कालावधीत संस्था व शाळा यांनी केलेल्या वैशिट्यपूर्ण कार्याचा आढावा सविस्तरपणे विशद केला.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, इंग्रजी शाळांचे प्रमाण वाढत असल्याने विद्यार्थी टिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे गुणवत्ता कायम राखावी लागत आहे. भादली येथील रूरल एज्युकेशन सोसायटी या संस्थेने आजवर लौकीक जपला आहे. आपण शिक्षणात यथातथाच होतो. मात्र शिक्षक होण्याची संधी चालून आली होती. तथापि, शिक्षक होण्याऐवजी राजकारणातील मास्तर झालो. अंगच्या कलागुणांमुळे आपण कलाकारदेखील होऊ शकलो असतो. मात्र राजकारणातील कलाकार झालो असे पालकमंत्री म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. शाळेला मदतीसाठी कटीबध्द असल्याचे अभिवचन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते शाळेतील प्रोजेक्टर रूमचे उदघाटन करण्यात आले. ते म्हणाले की, संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून खासदार निधीतून संस्थेला शैक्षणिक साहित्य मिळवून देऊ. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा नारखेडे, यांनी केले तर आभार एस.पी. ठाकूर यांनी मानले.