चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची धिंड काढत त्यांना थेट पोलिस ठाण्यात आणल्याची कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन कडक कारवाई करण्यात येत आहे.
भीमनगर परिसरात झालेल्या हाणामारीत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर मेहतरवाड्यातून शहर पोलिस ठाण्यापर्यंत या संशयितांची धिंड काढण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्यांना पोलिसी हिसका दाखवत कायद्याचे गांभीर्य स्पष्ट केले.
या मोहिमेत पीएसआय योगेश माळी, संदीप घुले यांच्यासह पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून शहरातील नागरिकांकडून पोलिसांच्या या कृतीचे स्वागत होत आहे.









