एमपीडीए प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील आसोदा गावात राहणारा वैभव सपकाळे याच्यावर जळगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एमपीडीए प्रस्ताव प्रलंबित होता. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजुरी दिली आहे. वैभव सपकाळे याला नागपूर कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
जळगांव तालुका पोलीस स्टेशन हददीतील वैभव विजय सपकाळे, (वय १९ रा. आसोदा ता.जि. जळगांव) याचेवर खुनाचा प्रयत्न, पोलीसांवर हल्ला, शस्त्रासह गैर – कादयाची मंडळी जमविणे, दुखापतीसह जबरी चोरी यासारखे शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहे. स्थानबदद इसम हा लहानपणापासुनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने सदर इसमाने असोदा गावात व आजुबाजुच्या परिसरातील सर्व सामान्य जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात भिती व दहशत निर्माण केली होती.
सदर इसमावर कायदयाचा धाक राहावा व त्याचे वर्तवणुकीत सुधारणा व्हावी याकरीता पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिक्षक संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली तरुणावर दाखल गुन्हयाचे आधारे एमपीडीए कायदयाअंतर्गत प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी, जळगांव यांचेकडेस सादर केला होता.
दिनांक २८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी सदर धोकादायक इसम वैभव विजय सपकाळे यास एमपीडीए कायदयानुसार धोकादायक व्यक्ती म्हणुन स्थानबध्दतेचा आदेश पारीत केला आहे. सदर वैभव विजय सपकाळे यास नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे दाखल केले आहे.