एरंडोल येथे छातीत आसारी घुसून बालकाचा झाला होता मृत्यू
एरंडोल (प्रतिनिधी) : शहरातील जुना धरणगाव रस्ता भागातील भिलाटी परिसरातील एका दहा वर्षीय बालकाच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल मयत बालकाच्या पित्याच्या फिर्यादीवरून नगरपालिकेच्या अभियंता आणि ठेकेदाराविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विशाल रवींद्र भिल (वय १०) असे मयत बालकाचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळी तो खेळत असताना त्याच्या घरासमोरील नगरपालिकेच्या सिमेंटच्या गटारीचे काम चालू असलेले ठिकाणे नाल्यातून अर्धवट बाहेर आलेल्या आसारीवर पडून व आसारी छातीत घुसून या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी समस्त भिल्ल समाज संघटनेच्या वतीने संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा घेण्यात आला होता.
दरम्यान पोलिसांनी शांततेचे आवाहन करीत मयत विशाल याचे पिता रवींद्र भिल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून घेतला आहे. यामध्ये म्हटले आहे की, त्यांचा मुलगा विशाल हा बाहेर खेळत असताना नगरपालिकेच्या सिमेंटच्या गटारीचा काम चालू असलेल्या ठिकाणी नाल्यातून अर्धवट बाहेर पडलेल्या गजावर डाव्या बाजूने पडून आसारी त्याच्या छातीत घुसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
डॉक्टरने त्याला मयत घोषित केले आहे. गटारीचे निष्काळजीपणे काम करून वर सोडलेल्या अर्धवट लोखंडी गजावर पडल्यामुळे त्यांच्या मुलाच्या मृत्यू ठेकेदार व कामावर देखरेख ठेवणारे अभियंता हे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद त्यांनी दिली आहे. एरंडोल पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.