अचूक नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवा

– पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव (प्रतिनिधी ) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ८३८ गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी तब्बल ९२६ कोटी ७८ लक्ष रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यातील ७७ गावांना ना. गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार तांत्रीक मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनांना १०-१२ दिवसात प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक तयार असलेल्या ९४ गावांच्या योजनांना देखील तात्काळ तांत्रिक मान्यता देण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी पाणीपुरवठा विभागाला दिलेले आहे. दरम्यान, ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर झालेल्या आहेत, तेथील सरपंच व अधिकाऱ्यांनी समन्वयातून अचूक नियोजन करून पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहन केले. आज अजिंठा शासकीय विश्राम गृह, जळगाव येथे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ना. गुलाबराव पाटील बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, आधीच्या पाणी पुरवठा योजनांमधील सर्व त्रुटी दूर करून राज्य व केंद्र सरकारने जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. याच्या अंतर्गत सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी योजनेत जिल्ह्यातील ८३८ गावांसाठी तब्बल ९२६ कोटी ७८ लक्ष रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जलजीवन मिशन मध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. आधीच्या योजना जलसाठा करणार्या टाकीपर्यंत पाणी पोहचवण्यासाठी होत्या. आता जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक घराला नळजोडणी मिळणार आहे.
या योजनेच्या संदर्भात पालकमंत्री ना. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सूचना दिल्या होत्या. ते म्हणाले की पाणी पुरवठा योजना सुरु करण्यापूर्वी पाण्याचा स्त्रोत तपासून घ्या. कारण स्त्रोत हा सर्वात महत्वाचा घटक असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच योजना राबविणाऱ्या ग्रामपंचायतीने राष्ट्रीयीकृत बँकेत जल जीवन मिशनसाठी स्वतंत्र खाते उघडून यात कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी लोकवर्गणी जमा करणे आवश्यक आहे. यासोबत जिल्हा परिषदेला आवश्यक असणारी कागदपत्रे, ठराव, टाकीच्या जागा तसेच विहीर यांच्या जागा तात्काळ हस्तांतरित करणे; बुडीत क्षेत्रांमधील विहीर असल्यास त्यासंबंधी प्रस्तावास आवश्यक असणार्
या कागदपत्रे उपविभागात सादर करणे देखील गरजेचे आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर पाणी तपासणी करावी, लोकांमध्ये जनजागृती करावी. तसेच अंगणवाडी आणि शाळांना नळ जोडणीत प्राधान्य द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. तर योजनांच्या अंमलबजावणीत काहीही अडचण आल्यास पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधा किंवा माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले होते. यानंतर आता प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अचूक नियोजनाने पाणीपुरवठा योजनांची यशस्वी अंमलबजावणी करावी असे आवाहन नामदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया , जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगवाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी.निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे आदी उपस्थित होते.
योजनांचा तालुकानिहाय गोषवारा
अमळनेर -11 गाव – 10 कोटी 14
लाख , एरंडोल – 9 गावं- 5 कोटी 50 लाख ,.चाळीसगाव – 8 गाव – 10 कोटी 74 लाख, चोपडा – 4 गाव – 2 कोटी 44 लाख, जळगाव – 6 गाव – 4 कोटी 25 लाख, जामनेर – 6गावं – 5 कोटी 12 लाख , धरणगाव – 7 गाव – 7 कोटी 9 लाख, पाचोरा- 6 गाव – 5 कोटी 40 लाख , पारोळा – 6 गावं – 5 कोटी 45 लाख, भडगाव – 1 गाव – 1कोटी 15 लाख, भुसावळ – 5 गावं – 2 कोटी 16 लाख, मुक्ताईनगर – 4 गावं – 2 कोटी 3 लाख, यावल – 3 गावं – 1 कोटी 31 लाख, रावेर – 1 गावं – 83 लाख असे एकूण 77 गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी 63 कोटी 60 लाख निधीसाठी तांत्रीक मान्यता देण्यात आली आहे.
या गावांना मिळाली मान्यता
अमळनेर तालुक्यातील अंबारे- खापरखेडा,कन्हेरे, सारबेटे , शिरूळ , कळमसरे धुपी ,कोंधावळ , जवखेडे, ढेकूसीम, रुंधाटी व पाडळसे एरंडोल तालुक्यातील मुखपाठ, आनंदनगर , खर्ची खुर्द , ताडे, गालापूर , पळासदळ, हनुमंत खेडे बुद्रुक , जवखेडा सिम व उमर्दे , चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण, भवाळी, तमगव्हाण , सांगवी, इच्छापुर, चैतन्य तांडा , धामणगाव व खडकी सीम , चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रुक, माहिदे, वडती पुंनगाव , जळगाव तालुक्यातील पाथरी, पिलखेडा, धामणगाव, आमोदा बुद्रुक ,किनोद, वाघनगर , जामनेर तालुक्यातील पळासखेडा, नेरी दिगर, भाग्दरा, मोयगाव बुद्रुक , मालखेडे , खडकी – बोरगाव , धरणगाव तालुक्यातील शेरी , सतखेडे, साळवा , रोटवद, पथराड बुद्रुक , मुसळी बुद्रुक व खुर्द , खामखेडे, पाचोरा तालुक्यातील भडाळी, लासुरे , विष्णूनगर, वाडी, लासगाव व बदरखे, पारोळा तालुक्यातील करमाड बुद्रुक, सुधाकर नगर, करमाड खुर्द, महालपूर, शेवगे बु. टोळी भडगाव तालुक्यातील मळगाव, भुसावळ तालुक्यातील सुनसगाव, भानखेडा, वांजोळा , फेकरी, जोगलखेडा, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी अकाउत, बोरखेडा, रुईखेडा, मन्यारखेडा , यावल तालुक्यातील महेलखेडी, मनवेल, बोरखेडा बुद्रुक तर रावेर तालुक्यातील चिनावल या 77 गावांच्या पाणीपुरवठा योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.







