जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या काळाने डॉक्टरांची महत्ता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. डॉक्टर हे ईश्वराचे प्रतिरूप असून आज आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून खान्देश गौरव पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात येत असल्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. डॉक्टरर्सनी कोरोनाच्या काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता अविरतपणे सेवा केली. प्रशासन आणि डॉक्टर्सच्या एकत्रीत प्रयत्नांमुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकला आहे. यापुढे भविष्यातही आपण सोबत काम करून निरोगी समाज निर्मिती करू अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली. आयमा संस्थेतर्फे आज सात विविध पॅथींच्या डॉक्टर्सच्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
आयुष इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेतर्फे आज जिल्ह्यातील ८५ विविध डॉक्टर्सला त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव म्हणून आयमा खान्देश रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, आयमाचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पाटील। आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची खासियत म्हणजे आयुर्वेद, अॅक्युपंक्चर, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी या सात विविध पॅथींच्या माध्यमातून आरोग्यसेवा करणार्या ज्येष्ठ डॉक्टर्सचा गौरव करण्यात आला. डॉ. नितीन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. तर खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर्सच्या कार्याचा गौरव केला.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीतील भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, आपण डॉक्टर नसलो तरी कोरोनाने आपल्याला अर्धे डॉक्टर बनविले आहे. कुणाला रेमडीसीवर हवे, तर कुणाला ऑक्सीजन बेड अशा मागण्यांपासून मला देखील डॉक्टरकीमधले बर्यापैकी कळू लागले आहे. तर देवकरआप्पांचे आता हॉस्पीटलच असल्यामुळे ते पूर्ण डॉक्टर असल्याची मिश्कीला पालकमंत्र्यांनी करताच उपस्थितांनी याला जोरदार दाद दिली.
या कार्यक्रमाचे अतिशय बहारदार असे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. तर आभार डॉ. नितीन पाटील यांनी मानले.