अमळनेर पोलीस स्टेशनची कामगिरी
अमळनेर (प्रतिनिधी) – गुजरात राज्यातील काही गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे राहणार मनोज शिवाजी पाटील (वय ३४) याच्यावर गुजरात व बिल्लीमोरा येथे खून, खुनाचा प्रयत्न आदी प्रकारचे १० ते १२ गुन्हे दाखल आहेत. गुजरात पोलिसांना तो अनेक दिवसांपासून चकवा देत होता. त्याचा माग काढून देखील त्या जागेवर सापडत नव्हता. अखेरीस गुजरात पोलिसांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना संशयित आरोपी पकडून देण्याची विनंती केली. निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल विजय भोई, राहुल पाटील आणि प्रशांत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपीला पकडण्यासाठी पातोंडा येथे पाठवले. संशयित आरोपीची दहशत असल्याने त्याचे घर कोणी दाखवायला तयार नव्हते. अखेरीस एकाने लांबून त्याचे घर दाखविले. पोलीस त्याच्या घराजवळ पोहचताच तरुणाला पोलीस आल्याची माहिती मिळाली. त्याने घराच्या मागच्या दाराने पळ काढला. पोलिसही त्याच्यामागे धावले. पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करून पकडले. पोलीस स्टेशनला आणून कार्यवाही पूर्ण करून गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.