शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दि. ७ फेब्रुवारी रोजी अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागांतर्गत ६४ वर्षाच्या महिलेवर गुडघे प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. वैद्यकीय पथकाच्या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.
सदर वृद्ध महिला ही गुडघेदुखीने मागील २ वर्षापासून त्रस्त असून ब-याच ठिकाणी औषधोपचार व भौतिकोपचार (फिजिओथेरपी) घेवून देखील सदर महिलेस आराम मिळत नव्हता. त्यामुळे सदर महिला शासकीय विद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात तपासणी करीता आली होती. सर्व तपासणीअंती तिच्यावर गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागांतर्गत मागील ६ महिन्यात खुबे प्रत्यारोपणाच्या ११ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आलेल्या असून मणक्यांच्या जटील शस्त्रक्रिया अस्थिव्यांगोपचार विभाग व द स्पाईन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेल्या आहेत. सदर शस्त्रक्रिया प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. राजकुमार सुर्यवंशी, सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल पाटील, डॉ. निलेश पाटील, डॉ. हनुमंत काळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
तसेच अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांनी सुपर स्पेशालिटी शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनसामग्री व उपकरणे उपलब्ध करून दिलेली आहेत. शासकीय रुग्णालयमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना योग्य तो उपचार करण्याबाबत सल्ला देण्यात येते. त्या अनुषंगाने अस्थिव्यंग उपचारशास्त्र विभागात गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, खुबे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, मणक्यांच्या शस्त्रक्रिया, हिप रिप्लेसमेंट, मणक्यांच्या शस्त्रक्रिया या अवघड शस्त्रक्रिया सातत्याने करण्यात येत आहेत. या सर्व सोयींचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.