उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जळगावमध्ये अनोखे आंदोलन
जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यातील शेतकरी आत्महत्या, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि मंत्र्यांच्या गैरकारभाराचा निषेध करत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जळगावमध्ये आक्रमक आंदोलन केले. महायुती सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन या तिन्ही मंत्र्यांच्या प्रतिमेला चुना फासून, त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ जुलै रोजी दुपारी १ वाजता झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव ग्रामीणचे उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी केले. आंदोलकांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना, कृषीमंत्री विधानभवनात ऑनलाईन रमी खेळत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, हमीभाव आणि भाव फरकाच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उचलून धरला.गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर त्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवल्याचा गंभीर आरोप करत, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याऐवजी ते स्वतःच नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा आंदोलकांनी केला.
भाजपा नेते प्रफुल्ल लोढा यांच्या हनीट्रॅप आणि पॉक्सो अंतर्गत अटकेचा मुद्दा उपस्थित करत, जलसंपदा, कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनीही तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. या तिन्ही मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि सरकारने राज्यातील शेतकऱ्या व नागरिकांना न्याय द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह तालुका कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, अशोक आप्पा सोनवणे, किरण ठाकूर, लोटन सोनावणे, प्रभाकर कोळी, धनराज वारडे, रघुनाथ सोनवणे, स्वप्नील पाटील, खुशाल पाटील, राजू पाटील, अनिल बोरसे, नितीन चौधरी आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.